जत,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
जत तालुक्यातील माडग्याळ गावात अंधश्रद्धेच्या पार्श्वभूमीवर दोन शेजारी कुटुंबांमध्ये निर्माण झालेला वाद अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मध्यस्थीने अखेर मिटला. गावात गेल्या काही महिन्यांपासून एक विचित्र प्रकार समोर येत होता — “तुमच्या मृत वडिलांचा आत्मा आमच्या घरात येतो आणि त्रास देतो”, असा आरोप एक कुटुंब दुसऱ्यावर करत होते. या अंधश्रद्धेच्या आरोपांमुळे दोन शेजारी कुटुंबे अबोला धरून राहू लागली होती आणि एकमेकांवर जादूटोण्याचे आरोप करीत होती.
वादाची सुरुवात : आत्म्याच्या शांतीचा तगादा
सहा वर्षांपूर्वी एका कुटुंबातील वृद्धाचा मृत्यू झाला होता. शेजारी राहत असलेल्या कुटुंबात सध्या महिला व लहान मुले वारंवार आजारी पडत असल्याने त्यांनी याचे कारण “मृत वृद्धाचा अशांत आत्मा” असे मानले. त्यानंतर त्यांनी त्या मृत व्यक्तीच्या कुटुंबाला “तुमच्या वडिलांच्या आत्म्याची शांती करा, खानादाना द्या” असा तगादा लावला. मात्र, विज्ञाननिष्ठ विचारसरणी असलेल्या कुटुंबाने हे नाकारले. यानंतर गावात त्यांच्यावर जादूटोण्याचा आरोप करत बदनामी सुरू झाली.
अंनिसचा हस्तक्षेप : वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजावणी
ही बाब अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) च्या जाडर बोबलाद शाखेपर्यंत पोहोचली. जिल्हा सचिव रवी सांगोलकर यांनी गावात जाऊन दोन्ही कुटुंबांची बैठक घेतली. बैठकीला गावचे पोलीस पाटील सिद्धान्ना ऐवळे यांचीही उपस्थिती होती. सांगोलकर यांनी स्पष्टपणे सांगितले की, “आत्मा, पुनर्जन्म अशा गोष्टी वैज्ञानिक दृष्टिकोनातून सिद्ध झालेल्या नाहीत. मृत व्यक्तीचा आत्मा कुणाला त्रास देतो, असा समज केवळ अंधश्रद्धा आहे. घरातील आजारपणासाठी वैद्यकीय सल्ला घ्यायला हवा.”
कायद्याची जाणीव : अंधश्रद्धेवर कायदेशीर कारवाईचा इशारा
अंनिसने या वेळी गावकऱ्यांना जादूटोणा विरोधी कायद्याची माहिती दिली. खोटे आरोप, सामाजिक बहिष्कार किंवा मानसिक छळ हे सर्व कायद्याच्या चौकटीत गुन्हे असून, असे प्रकार झाल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा दिला.
या समोपचार बैठकीनंतर दोन्ही कुटुंबांनी आपली भूमिका बदलत शांततेने राहण्याचे आणि एकमेकांवर अंधश्रद्धेचे आरोप न करण्याचे मान्य केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे गावात शांतता प्रस्थापित झाली. या बैठकीस शाखेचे अध्यक्ष संतोष गेजगे, कार्यकर्ते संतोष शिंदे, राहुल थोरात, डॉ. संजय निटवे यांची उपस्थिती होती.
अंनिसचा संदेश : अंधश्रद्धेपासून सावध राहा
या प्रकरणानंतर अंनिसच्या कार्यकर्त्यांनी जनतेला आवाहन केले की, कुठल्याही आजारपण, संकट किंवा अडचणींमागे अदृश्य शक्तीचा संबंध जोडण्याऐवजी वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवावा. अशा परिस्थितीत कोणी खोटे आरोप करत असल्यास, थेट अंनिसशी संपर्क साधावा.
ही घटना केवळ माडग्याळ गावापुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण समाजासाठी एक धडा आहे. अंधश्रद्धेवर आधारलेल्या गैरसमजुती व चुकीच्या आरोपांमुळे समाजात फूट पडते. अशावेळी अंनिससारख्या संस्थांचा हस्तक्षेप आणि वैज्ञानिक विचारसरणी समाजात शांतता आणि बंधुभाव राखण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.