सारांश: सांगली शहरात भरदिवसा एका युवकाचा तीन अल्पवयीन मुलांनी एडका, कोयता व चाकूने निर्घृण खून केला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सांगली पोलिसांनी केवळ दोन तासांत सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींचा शोध घेत त्यांना लक्ष्मी फाट्याजवळ अटक केली. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली हत्यारे जप्त करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या जलद कारवाईमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.
सांगली,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
सांगली शहरामध्ये भरदिवसा सेंट्रींग कामगारावर कोयत्याने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला. भर रस्त्यात झालेल्या घटनेने खळबळ उडाली. या हल्ल्यात दत्ता शरणाप्पा सुतार (वय ३०, शिवशंभो चौक, मूळ रा. इंदिरानगर) याचा मृत्यू झाला. दरम्यान या कामगाराचा निर्घृण खून करून पसार झालेल्या तीन विधीसंघर्षित (अल्पवयीन) बालकांना सांगली शहर पोलिसांनी केवळ दोन तासांच्या आत अटक केली.
सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे शहरात पोलिसांचे कौतुक होत आहे. मात्र भरदिवसा एका तरुणाचा खून झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मृत दत्ता शरणाप्पा सुतार हा सेंट्रींग कामगार आहे. तो यापुर्वी इंदिरानगर परिसरात राहण्यास होता. गेल्या काही दिवसांपासून शिवशंभो चौकातील एका महिलेशी अनैतिक संबंध होते. त्यामुळे सुतार हा त्या महिलेच्या घरीच राहण्यास होता. त्यांच्यासोबत त्या महिलेचा अल्पवयीन मुलगाही राहत होता.
घटनेचा तपशील
दि. २० फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी १.३० च्या सुमारास सांगलीवाडी बायपास रोडवरील कदमवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अतुल दत्तात्रय ठोंबरे (वय १९) आणि त्याचा मित्र दत्ता शरणाप्पा सुतार (रा. इंदिरानगर, सांगली) हे मोटरसायकल (क्र. MH-09-BQ-4985) वरून जात असताना तीन विधीसंघर्षित बालकांनी त्यांना अडवले.
या बालकांनी बोलण्याच्या बहाण्याने दत्ता सुतार याला खाली उतरवले आणि अचानकपणे त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. आरोपींपैकी एकाने कमरेला लावलेला ‘एडका’ काढून त्याच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर वार केले, तर दुसऱ्याने कोयत्याने आणि तिसऱ्याने चाकूने गळ्याजवळ तसेच हनुवटीवर सपासप वार केले. एवढ्यावरच न थांबता पहिल्या बालकाने रस्त्याच्या कडेला पडलेला दगड आणून दत्ता सुतार याचे डोके ठेचले. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या अमानुष हत्येनंतर तिन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
पोलीस तपास व जलद कारवाई
गुन्ह्याची माहिती मिळताच सांगली शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विमला एम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी तातडीने गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकाऱ्यांना आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले.
सहायक पोलीस निरीक्षक सागर गोडे, पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानुसार, आरोपी लक्ष्मी फाटा सांमिकु महानगरपालिका कचरा डेपोजवळ लपल्याची माहिती मिळाली. तातडीने कारवाई करत पोलिसांनी त्या परिसरात सर्च ऑपरेशन राबवले.
आरोपींना पोलिसांची चाहूल लागताच ते काटेरी झुडपांमध्ये लपण्याचा प्रयत्न करत होते, मात्र पोलीस पथकाने त्यांचा वेळीच पाठलाग करून तिन्ही विधीसंघर्षित बालकांना अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली हत्यारे – एडका, कोयता आणि चाकू जप्त करण्यात आले आहेत.
हे देखील वाचा: health benefits: पिस्ता खाण्याचे महत्त्वाचे आरोग्यदायी 8 फायदे जाणून घ्या
पुढील तपास सुरू
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर गोडे करीत आहेत. दरम्यान, त्याचवेळी संशयित मुलगा आणि त्याचे दोन साथीदार त्याठिकाणी होते. अनैतिक संबंधाचा राग पुर्वीपासूनच त्या मुलाच्या मनात होता. त्याच रागातून त्याने काटा काढण्याचा कट रचला. प्राथमिक चौकशीतून या हत्येमागील स्पष्ट कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू असून आरोपींची पार्श्वभूमी तपासली जात आहे.
या वेगवान कारवाईमुळे सांगली पोलिसांनी पुन्हा एकदा आपली तत्परता सिद्ध केली असून, गुन्हेगारी प्रवृत्तीला वचक बसेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.