ऋतुमानानुसार 'सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये करवंद हा रानमेवा बहरत असतो. सध्याच्या वैशाख - ज्येष्ठ ऋतुमानात डोंगरातील काटेरी झुडपाला लागणारी करवंदे चांगलीच बहरली आहेत.
करवंदे ठेवण्यासाठी अनेकजण डोंगररांगांमधील परिसरात बहरलेल्या 'पळस' या वृक्षाची पाने वापरतात. 'पळसा'ची एकसमान आकाराची पाने घेऊन ती एकमेकांवर उपडी केली जातात.
पळसाची पाने 'वाळक्या जुन' नावाच्या गवताच्या काडीने शिवले जाते. त्या पानांपासून तयार झालेल्या खोच्याला बोरे, करवंदे साठवण 'द्रोण खोच्या' म्हणतात.
'डोंगराची काळी मैना' म्हणून प्रचलित असलेले करवंद हे फळ आरोग्याच्या दृष्टीने फारच उपयुक्त आहे. करवंद ही नैसर्गिकरीत्या जंगलात वाढत असल्याने त्याच्यावर रासायनिक प्रक्रिया केली जात नाही.
दिवसेंदिवस वाढणाऱ्या उकाड्यात ही फळे खूप लाभदायक ठरतात, म्हणूनच ती वेगवेगळ्या विकारांवर गुणकारी मानली जातात.
उन्हाळ्यात येणाऱ्या करवंदामध्ये 'क' जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात मिळते. त्वचाविकारांमध्ये करवंद सेवन केल्याने मोठा फायदा होतो.
करवंद हा रानमेवा आहे.त्यामुळे त्याच्या सेवनाने कोणताही दुष्परिणाम होत नाही. रोज मूठभर करवंदे खावीत. रक्ताची कमतरता नक्कीच भरून निघते.
करवंदांमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढते. उष्णतेमुळे होणारे विकार करवंद सेवनाने कमी होतात.
अरुची, मळमळ, उलटी या विकारांमध्ये करवंदे अत्यंत गुणकारी ठरते. करवंदाची पानेदेखील औषधी गुणधर्मानेयुक्त आहेत. करवंदांमध्ये कॅल्शिअमही भरपूर प्रमाणात मिळते.